नंदीग्राम : येत्या १ एप्रिलला निवडणूक होणार असलेल्या पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम मतदारसंघात शनिवारी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकत्र्यांमध्ये संघर्ष होऊन किमान तीन जण गंभीर जखमी झाल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

तथापि, भाजपने भाड्याने आणलेल्या गुंडांनी आमच्या कार्यकत्र्यांवर हल्ला केल्याचा दावा तृणमूलच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी यांचे निवडणूक एजंट शेख सुफियान यांनी केला. भाजपने मात्र हा दावा फेटाळला आहे.

‘‘या हल्ल्यात जखमी झालेले तिघेही तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते,’’ असे सुफियान म्हणाले. भाजपच्या गुंडांनी गेल्या १५ दिवसांपासून नंदीग्राममध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे, असा आरोप त्यांनी केला. मात्र एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सुफियान यांचा आरोप नाकारताना, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात येऊन या भागात शांतता प्रस्थापित करण्यात आल्याचे सांगितले.

ममता बॅनर्जी व शुभेंदु अधिकारी यांची चुरशीची लढत होत असलेल्या या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे लोक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केला. आमच्यापैकी कुणीही तृणमूल कार्यकत्र्यांवरील हल्ल्यात सहभागी नसल्याचे ते म्हणाले.