अमरनाथ यात्रेत मध्य काश्मीरमधील गंदेरबाल जिल्ह्य़ात १६ कि.मी.च्या बालताल मार्गावर शुक्रवारी एक गुहा ढगफुटीने कोसळली. यात तीन ठार तर इतर १९ जण जखमी झाले आहेत. काल रात्रीच्या ढगफुटीने दोन जण बेपत्ता आहेत. असे असले तरी अमरनाथ यात्रा सुरळीत चालू असून अनंतनाग जिल्ह्य़ातील पहलगामच्या ४५ कि.मी.च्या रस्त्यावर भाविक दिसत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण हजार भाविकांना बालताल येथील बेस कॅम्पवरून पुढे सोडण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की १३ वर्षांची मुलगी १२ वर्षांचा मुलगा यांच्यासह तीन मृतदेह सापडले आहेत व इतर १९ जण जखमी झाले असून दोन जण बेपत्ता आहेत. बालताल बेस कॅम्पवर ढगफुटी झाली व पाणी काही तंबूंमध्ये शिरले. अनेक नागरिकांना या वेळी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मृत भाविकांमध्ये बालताल येथे मुक्कामी असलेल्यांचा समावेश आहे. दीपकुमार (दिल्ली) व पूजा तसेच विक्रम ही राजस्थानची मुले यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सकाळी ११ लोक बेपत्ता असल्याचे समजले पण त्यानंतर त्यांच्यातील अनेक जण बेस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.