मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचा वाद सुरू असताना फ्रान्सच्या नीस शहरातील चर्चमध्ये एका माथेफिरूने केलेल्या चाकूहल्ल्यात गुरुवारी तिघांचा मृत्यू झाला.मृतांमध्ये चर्चच्या वॉर्डन महिलेचा समावेश आहे. हा दहशतवादी हल्ला असल्याचे नीसच्या महौपारांनी सांगितले.

पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून तो पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. फ्रान्सच्या दहशतवादविरोधी कार्यालयाने या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांत फ्रान्समध्ये झालेला अशा प्रकारचा हा तिसरा हल्ला आहे. हल्लेखोर एकच होता, असे मानले जात आहे.

हल्लेखोर जखमी झाल्यानंतरही ‘अल्लाहु अकबर’ अशा घोषणा वारंवार देत होता, असे नीसचे महापौर ख्रिस्तीन एस्त्रोसी यांनी सांगितले. हल्ल्यात चर्चच्या आत दोघे आणि बाहेर एक अशा तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. हल्ल्याचे वृत्त येताच फ्रान्सच्या कनिष्ठ सभागृहातील करोनाबाबतच्या नव्या निर्बंधांवरील चर्चा स्थगित करण्यात आली. त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्रॉनही नीसला रवाना झाले.

..आधीचे हल्ले

* २०१६ साली बॅस्टिल डे समारंभासाठी जमलेल्या गर्दीत एका हल्लेखोराने ट्रक घुसवल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

* शार्ली एब्दो वृत्तपत्राच्या कार्यालयावरील, कोशर सुपरमार्केटवरील दहशतवादी हल्ल्यांच्या खटल्याची सुनावणी जानेवारी २०१५ मध्ये सुरू झाल्यानंतर हा तिसरा हल्ला आहे.