काश्मीरमध्ये दक्षिणेकडील पुलवामा जिल्हय़ात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी शनिवारी ठार झाले. पुलवामा जिल्हय़ात शोधमोहीम सुरू असताना ही चकमक झाली.
गुप्तचरांकडून सदर भागात दहशतवादी आल्याची माहिती मिळाली असता पुलवामा जिल्हय़ातील पांझगाम खेडय़ात संयुक्त पोलीस पथक व लष्कराने वेढा दिला. सुरक्षा दले तपासणी करीत असताना लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर जोरदार चकमक सुरू झाली. यात हिज्बुल मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार झाले. अशफाक अहमद दर (रा. डोगीपुरा), इशफाक अहमद बाबा (रा. तहाब) व हसीब अहमद (रा. ब्राव बदायून) यांचा त्यात समावेश आहे.

दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त; स्फोटके हस्तगत
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्य़ातील वनक्षेत्रात असलेला दहशतवाद्यांचा अड्डा सुरक्षा रक्षकांनी उद्ध्वस्त केला आणि तेथून शस्त्रे आणि स्फोटके हस्तगत केली, असे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षा रक्षकांना मिळालेल्या खबरीवरून पोलीस आणि लष्कराने कावल येथे संयुक्त शोधमोहीम हाती घेतली. वागिला वनक्षेत्रातही शोधमोहीम हाती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर छुप्या अड्डय़ावरून सुरक्षा रक्षकांनी दोन पिस्तुले, तीन मॅगझीन, चार एके-४७ मॅगझीन, पाच हातबॉम्ब, तीन तोफगोळे, बिनतारी यंत्रणा संच हस्तगत केला.