ओलिस ठेवलेल्या अल्पवयीन मुलाची हत्या

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा आणि शोपियन जिल्ह्य़ात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी अतिरेक्यांसह तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलाची हत्या केली आहे.

शुक्रवारी तीन दहशतवादी ठार झाल्याने राज्यात गेल्या २४ तासांत झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच झाली आहे. बंदिपोरा जिल्ह्य़ातील हाजिन परिसरामध्ये रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षारक्षकांनी शोपियनमधील इमामसाहिब परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम हाती घेतली. त्या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला, त्याला सुरक्षारक्षकांनी प्रत्युत्तर दिले.

झाले काय? सुरक्षा दलांनी गुरुवारी आपल्या कारवाईला सुरुवात केली. हाजिन येथील कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले, त्यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून ते पाकिस्तानचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. अब्दुल हमीद या एका ओलिसाची गुरुवारी सायंकाळी सुटका करण्यात आली, मात्र आतिफ अहमद या अल्पवयीन ओलिसाची दहशतवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केली. शोपियन जिल्ह्य़ात सुरक्षारक्षकांसमवेत शुक्रवारी झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी ठार झाला.

यासिन मलिकच्या संघटनेवर बंदी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कायद्यान्वये यासिन मलिक याच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीवर (जेकेएलएफ) बंदी घातली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये फुटीर कारवायांना प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून जेकेएलएफवर बंदी घालण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.