जम्मू- काश्मीरच्या बंदीपुरा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अनोळखी दहशतवादी ठार झाले, तर लष्कराचा एक जवान जखमी झाला.

उत्तर काश्मिरातील बंदीपुरा जिल्ह्याच्या सुंबलर भागातील शोकबाबा जंगल भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. ती सुरू असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी याचे प्रत्युत्तर दिल्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या चकमकीत ३ सैनिक जखमी झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते, मात्र केवळ एक सैनिक जखमी झाला असल्याचे श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी इम्रान मुसावी यांनी सांगितले. या सैनिकाला उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसून, ते कोणत्या गटाचे होते हेही स्पष्ट झालेले नाही.