भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं दाखल होणार आहेत. बुधवारी संध्याकाळपर्यंत ही विमानं भारतीय वायुदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली असतील. बुधवारी सकाळी फ्रान्सहून ही तीन राफेल विमानं उड्डाण करतील आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत भारतात पोहचतील असं केंद्र सरकारच्या सूत्रांनी एएनआयाला सांगितलं आहे. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आणखी तीन राफेल विमानं आल्याने वायुदलाचं बळ वाढणार आहे.

भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. फ्रान्स ते भारत या प्रवासात अबू धाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर ही विमाने एकदिवस थांबली होती. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. आता भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आणखी तीन विमानं येणार आहेत. त्यामुळे अर्थातच भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे.

काय आहेत राफेल विमानाची खासियत?
हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र

मिटिऑर
हवेतून हवेत मारा करण्यास सक्षम, ज्याची रेंज आहे १५० किमी

स्काल्प
हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम, ज्याची रेंज आहे ३०० किमी

राफेलची लांबी १५.३० मीटर आहे, तर रुंदी १०.८० मीटर आहे.

राफेलची उंची १०.८० मीटर आहे

इंधन क्षमता ४ हजार ७०० किलो आहे

राफेलचा वेग २१३० किमी प्रतितास आहे

राफेलचं वजन १५ हजार किलो आहे (शस्त्रांसह)

भारतीय वायुदलाची ताकद या विमानांमुळे वाढणार यात शंकाच नाही. एकूण ३६ विमानांपैकी पाच विमानं जुलै महिन्यात भारतात आली. आता तीन विमानं बुधवारी भारतात येणार आहेत.