करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व दुकानंही बंद ठेवण्यात आली आहे. परंतु यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत झाल्याचं दिसत आहे. काही ठिकाणी मद्याची दुकानं फोडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे दुकानाच्या मालकांना त्यांच्या दुकानासमोर सुरक्षा रक्षक नेमण्याची वेळ आली आहे. अशातच तामिळनाडूमधून एक घटना समोर आली आहे. काही लोकांना मद्य न मिळाल्यामुळे त्यांनी चक्क पेंट वॉर्निश प्यायल्याची घटना घडली आहे.

तामिळनाडूतील चेंगलपेट जिल्ह्यात ही घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या तीन जणांना मद्याची सवय होती. परंतु त्यांना मद्य न मिळाल्यामुळे त्या तिघांनी पेंट वॉर्निशमध्ये पाणी मिसळून त्याचं सेवन केलं. यानंतर तिघांना उलट्या सुरू झाल्यानं त्यांना नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या ठिकाणी उपचारादरम्यान त्या तिघांचा मृत्यू झाला.

तपासादरम्यान या तिघांनाही मद्याची सवय असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मद्य मिळत नसल्यानं ते तिघं त्याच्या शोधात फिरत होते. दरम्यान, त्यांना मद्य न मिळाल्यानं पेंट वॉर्निशमध्ये पाणी मिसळून प्यायले. परंतु त्यांनंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या. या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये तामिळनाडूत घडलेली ही दुसरी घटना आहे. सॉफ्ट ड्रिंकमध्ये शेव्हिंग लोशन मिक्स करून प्यायल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली होती.

कर्नाटकात मद्याच्या बाटल्या लुटल्या
काही दिवसांपूर्वी काही तळीरामांनी एका दुकानातून मद्याच्या बाटल्या लुटल्याची घटना कर्नाटकात घडली होती. याव्यतिरिक्त नागपूरमध्येही मद्याच्या बाटल्या चोरल्याच्या घटना समोर आल्या होत्या. तर केरळ सरकारनंही तळीरामांसाठी विशेष पास दिले होते. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तीन आठवड्यांसाठी यावर रोख लावण्यात आली.