आंध्र प्रदेशातील एका मंदिरात तीन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आली आहे. ही नरबळीची घटना असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. पीडितांची ओळख पटली असून पंडित शिवरामी रेड्डी (७०), त्यांची बहिण कडपाला कमलम्मा (७५) आणि सत्या लक्ष्मीअम्मा अशी त्यांची नावे आहेत. गळा कापलेल्या अवस्थेत हे मृतदेह सापडले आहेत. तसंच त्यांचं रक्त मंदिरात शिंपडण्यात आलं होतं.

मंदिरात आलेल्या भक्तांनी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. लोकांनीच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांना आणि ग्रामस्थांना गुप्तधनाच्या शोधात हत्या करण्यात आल्या असाव्यात असा संशय आहे. १५ व्या शतकातील या मंदिराच्या डागडुजीचं काम सध्या सुरु होतं.

पंडित शिवरामी रेड्डी आणि इतर दोन महिला रविवारी रात्री मंदिरात झोपले असताना गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांनी त्यांचे गळे कापून हत्या केली. यानंतर त्यांचं रक्त मंदिरात शिंपडण्यात आलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी लक्ष विचलित करण्यासाठी गुन्हेगारांनी जाणुनबुजून तपास दुसऱ्या दिशेने जाईल अशा गोष्टी केल्या असाव्यात असाही संशय व्यक्त केला आहे.