एक छोटा उंदीर काय करू शकतो याचा अंदाज करता येणे शक्य नाहीये. होय कारण उंदरांमुळे तीन मजल्यांची इमारत कोसळली आहे. तुम्हाला ही बातमी ऐकून त्यावर विश्वास बसणार नाही. पण खरंच असे घडले आहे ते आग्रा या ठिकाणी. आग्रा येथील गजबजलेल्या भागात असलेली एक तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत महाकामेश्वर मंदिराजवळ होती.

पाहा व्हिडिओ

या इमारतीच्या खालच्या भागात उंदरांची बिळे आहेत. त्यांनी या इमारतीची जमीन पोखरली. हे प्रमाण इतके वाढले की या इमारतीचा पाया खचला, पाया खचल्यानेच ही इमारत कोसळली. पाइपलाइन्स, घरांच्या भिंतीही उंदरांनी पोखरल्या होत्या. आग्रा शहरात शनिवारी पाऊस झाला. या पावसाचे पाणी उंदरांनी केलेल्या बिळांमध्ये पोहचले. त्यानंतर ही इमारत पाहता पाहता कोसळली. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

इमारतीला मोठ्या प्रमाणावर तडे गेले होते त्यामुळे आम्ही घरे रिकामी केली होती असे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे इमारत कोसळूनही कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ही इमारत अशा प्रकारे कोसळून आमचे नुकसान होईल असेही रहिवाशांनी म्हटले आहे. शहरात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे असे महापौर नवीन जैन यांनी म्हटले आहे. तसेच यावर उपाय योजण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असेही जैन यांनी म्हटले आहे.