22 July 2018

News Flash

मोदींच्या हत्येचा डाव उधळला, अल कायदाच्या संशयित दहशतवाद्यांना अटक

मोदींसह देशभरातील २२ नेत्यांवर हल्ला करण्याचा या संशयित दहशतवाद्यांचा कट होता.

प्रातिनिधीक छायाचित्र

तामिळनाडूतील विविध ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तीन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हे तिघे जण अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप असून मोदींसह देशभरातील २२ नेत्यांवर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता अशी माहिती उघड झाली आहे.

एनआयएच्या पथकाला तामिळनाडूतील दक्षिण भागात अल कायदाचे दहशतवादी सक्रीय झाल्याची माहिती माहिती मिळाली होती. यानुसार एनआयएने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापा टाकून तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. एम खरीम, असीफ सुलतान मोहम्मद आणि अब्बास अली अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. खरीमला उस्माननगर, सुलतान मोहम्मदला जी आर नगर आणि अब्बास अलीला इस्लाइलपूरम या ठिकाणांवरुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून स्फोटक पदार्थ आणि शस्त्रास्त्रांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाची आणखी माहिती देण्यास तपास यंत्रणांनी तूर्तास नकार दिला आहे.

अटक केलेले तिघे जण दक्षिण तामिळनाडूमध्ये अल कायदासाठी काम करत होते. चित्तूर, कोल्लम, नेल्लोर, मलप्पूरम आणि अन्य दोन न्यायालयांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात या तिघांचा हात असल्याची शक्यता आहे. अटक केलेल्या तिन्ही संशयितांना आता पुढील चौकशीसाठी मैसूरमध्ये नेण्यात आले आहे. एनआयएचे पथक आता हकीम आणि दाऊद सुलेमान या दोघांचाही शोध घेत आहे. हे दोघे जण अल कायदासाठी काम करत असल्याचा संशय आहे.

First Published on November 28, 2016 6:46 pm

Web Title: three suspected al qaeda operatives arrested by nia police say they were planning to kill pm modi