जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात मंगळवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार सुरुवातीला या भागात शोध मोहिम राबवण्यात आली. त्यानंतर तिघांचा खात्मा करण्यात आला. अद्यापही इतर दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. या चकमकीत एक सीआरपीएफचा जवान जखमी झाला आहे.


माध्यमांतील वृत्तानुसार, जखमी जवानाला तातडीने लष्कराच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. या कारवाईला एक राजकीय कंगोरा असल्याचे बोलले जात आहे. कारण, मंगळवारी भाजपाने पाठिंबा काढून घेतल्याने जम्मू-काश्मीर राज्यातील पीडीपी-भाजपा सरकार कोसळले. तसेच मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भारतीय जवानांना आपली कारवाई कडक केली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये रमजानदरम्यान महिनाभर लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपल्यानंतर भारतीय लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून पुन्हा एकदा ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरू करण्यात आले आहे. बांदिपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सुरू झालेल्या चकमकीत सोमवार सायंकाळपर्यंत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.

भारतीय लष्कराला सोमवारी बिजबेहरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार जवानांनी या परिसरातील घरांभोवती वेढा घातला होता. गेल्या महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराकडून शस्त्रसंधी पुकारण्यात आली होती. यादरम्यान दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आणि २८ जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शस्त्रसंधीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.