मध्य प्रदेशातील पर्यटनाला वाव देण्यासाठी राज्यातील तीन अभयारण्यांमध्ये ‘टायगर सफारी’ सुरू करण्यात येणार आहेत. वन्यजीव क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मात्र या प्रस्तावाला विरोध केला आहे.
या टायगर सफारी बांधवगड, पेंच व कान्हा व्याघ्र अभयारण्यांत सुरू केल्या जातील. या विषयाबाबत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार, राज्य सरकारने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. वाघांचे मुख्य निवासस्थान असलेल्या कोअर एरियावरील दबाव कमी करण्यासाठी या सफारी बफर क्षेत्रात कार्यरत राहतील. सुरुवातीला कुंपण घालण्याच्या व इतर कामांसाठी मध्य प्रदेश इको-टुरिझम बोर्ड निविदा काढणार आहे. मात्र, पेंच अभयारण्यात टायगर सफारी सुरू करण्याचा प्रस्ताव सध्या लांबणीवर टाकावा असा आदेश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) काही काळापूर्वी दिला होता, असा दावा करून वन्यजीव कार्यकर्त्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. वाघांच्या संख्येबाबत मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा, संजय-डुबरी आणि पेंच या सहा व्याघ्र अभयारण्यांमध्ये सुमारे ३०८ वाघ आहेत.