येथे घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटांत तीन ते चारजणांचा हात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी येथे सूचित केले.
शिंदे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच नेत्या अंबिका सोनी यांच्यासमवेत घटनास्थळास भेट दिली. राष्ट्रीय सुरक्षा पथकाकडून या बॉम्बस्फोटाचा विस्तृत तपास सुरू असल्याचे सांगून भगवान बुद्धांच्या पवित्र स्थानी हा स्फोट घडवून आणल्याबद्दल शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. या पवित्र ठिकाणी असा स्फोट होणे ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. या घटनेचा तपास करण्यासाठी दोन मोठय़ा यंत्रणा कामास लावण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तपासकामास सुरुवात झाली असून अनेक लोकांचे जबाब घेण्यात येत असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. बिहार सरकारच्या विनंतीवरून या घटनेचा संपूर्ण तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेवर सोपविण्यात आल्याचेही ते म्हणाले.
शिंदे यांनी बॉम्बस्फोटांच्या सर्व ठिकाणी भेट दिली. पेरून ठेवण्यात आलेल्या १३ पैकी १० बॉम्बचे स्फोट झाले. दोन-तीन किलो वजनाचे छोटे गॅस सिलिंडर तसेच खिळे आणि बॉल बेअरिंग स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात आले होते. हे सर्व एका डिटोनेटरला जोडून त्याजवळ एक घडय़ाळही ठेवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान हे स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. या बॉम्बस्फोटात तीन ते चारजणांचा हात असून ते एका कारमधून आले होते आणि आम्ही सखोल तपास सुरू केला आहे, असे शिंदे म्हणाले.
याप्रकरणी अद्याप कोणासही अटक का करण्यात आली नाही, असे विचारले असता एखाद्यास घाईगर्दीत अटक करणे योग्य ठरणार नाही. सखोल तपासाअंतीच खऱ्या गुन्हेगारास पकडणे योग्य ठरेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
गया येथे झालेल्या स्फोटांमध्ये नक्षलवाद्यांचा हात आहे काय, असे विचारले असता यासंदर्भात दुसऱ्या देशातून भारतात होणारी घुसखोरी, जातीय तणाव अशा अनेक समस्या असून आपल्याला त्याकडे सर्व बाजूंनी बघावे लागते. त्यामुळे एक निष्कर्ष काढणे कठीण असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

धार्मिक स्थळांची सुरक्षा ‘सीआयएसएफ’कडे सुपूर्द करण्याची मागणी
बोधगयासारख्या धार्मिक स्थळांची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) देण्याची बाब तपासून पाहण्यात येईल, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी येथे सांगितले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत बोधगयाला भेट दिल्यानंतर एका वार्ताहर परिषदेत शिंदे यांनी सांगितले की, मंदिराच्या संकुलात उत्तम सुरक्षा ठेवण्यासाठी येथील व्यवस्था सीआयएसएफच्या ताब्यात देण्याची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर आणि जामा मशीद येथेही सीआयएसएफ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या तपासून पाहण्यात येतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे शिंदे म्हणाले. तथापि, सर्व धार्मिक स्थळांसाठीची ही मागणी पूर्ण करता येणे अशक्य आहे कारण अनेक संकुलांचा भेद करता येणे शक्य आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
बोधगया येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याची माहिती मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिव एन. दोरजे यांनी शिंदे आणि सोनिया गांधी यांना दिली. या नेत्यांनी महाबोधी मंदिरात प्रार्थनाही केली. त्यापूर्वी काही जणांच्या समूहाने नेत्यांच्या भेटीच्या निषेधार्थ निदर्शने केली.