अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने तीन ट्रक भरुन मोठेमोठ्या शिळा आणल्या आहेत. राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेने वादग्रस्त रामजन्म भूमीवर शिळा आणून ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच विश्व हिंदू परिषदेकडून या ठिकाणी शिळा आणण्यात आल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये विश्व हिंद परिषदेकडून राम मंदिराच्या उभारणीची तारीख घोषित केली जाणार आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येत आणल्या गेलेल्या शिळा ‘अयोध्या रामसेवक पुरम’मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याआधी २० जून रोजी विश्व हिंदू परिषदेने दोन ट्रेक भरुन शिळा आणल्या होत्या. बुधवारी तीन ट्रक शिळा आणल्यानंतर पुढील दोन दिवसांमध्ये आणखी शंभर ट्रक शिळा अयोध्येत आणल्या जातील, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिली. ‘राम मंदिराच्या उभारणीसाठी राजस्थानातील भरतपूरमध्ये शिळा आणण्यात आल्या आहेत. मंदिराच्या निर्मितीसाठी आणखी १०० ट्रक शिळा आवश्यक आहेत. त्या शिळा लवकरच अयोध्येत आणल्या जातील,’ अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते त्रिलोकी नाथ पांडे यांनी दिली. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या उभारणीची तयारी सुरु केली आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत शिळा आणण्यास परवानगी नाकारलेली नाही. न्यायालयासोबतच इतर कोणत्याही यंत्रणेने अयोध्येत शिळा आणण्यास मज्जाव केलेला नाही. याशिवाय विश्व हिंद परिषद त्यांच्या खासगी जागेत या शिळा ठेवत असल्याने यामध्ये नियमांचा भंग झालेला नाही,’ अशी माहिती फैझाबाद विभागीय आयुक्त मनोज मिश्रा यांनी दिली आहे.

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भाजपची राम मंदिर उभारणीची चळवळ मंदावली होती. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाल्यावर राम मंदिराच्या उभारणीला पुन्हा एकदा गती मिळताना दिसते आहे. २० डिसेंबर २०१५ रोजी राम जन्मभूमीच्या वादग्रस्त जागेत दोन ट्रक शिळा आणण्यात आल्या. या घटनेला मोठी प्रसिद्धी मिळाल्यावर तत्कालीन समाजवादी सरकारने अयोध्येत शिळा वाहून आणणाऱ्या ट्रकला आवश्यक असणारा ३९ क्रमांकाचा फॉर्म नाकारला होता.