सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या परिस्थितीत बिहारमधील जहानाबाद येथे मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. तीन वर्षाच्या एका तान्हुल्यानं आपल्या आईच्याच मिठीत आपले प्राण सोडल्याची घडना घडली. हा चिमुरडा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्यानंतर त्याची आई त्याला घेऊन जहानाबाद येथीस सरकारी रूग्णालयात पोहोचली. परंतु त्याची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्याला पाटण्यात हलवण्याच्या सूचना केल्या.

जहानाबादपासून पाटण्याचं अंतर जवळपास ५० किलोमीटर आहे. त्या चिमुरड्याला पाटण्याला नेण्यासाठी तब्बल २ तास अ‍ॅम्ब्युलन्सचा शोध घेण्यात आला. परंतु यादरम्यानच त्या चिमुरड्यानं आपल्या आईच्या कुशीतच आपले प्राण सोडले. बिहारच्या अरवल जिल्ह्यातून हे कुटुंब आलं होतं. जेव्हा त्या चिमुरड्याची तब्येत खराब झाली तेव्हा पहिल्यांदा त्याच्या आईनं कुर्था येथील आरोग्य केंद्रात नेलं. परंतु त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी त्याला जहानाबाद येथील रुग्णालयात नेण्यास सांगितलं. लॉकडाउनच्या परिस्थितीत ते जहानाबाद येथील रुग्णालयात पोहोचले. पण त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनही त्याला पाटण्याला नेण्यास सांगितलं.

सरकारी रुग्णालय असूनही त्या चिमुरड्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही, असं त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं. त्याच्या वडिलांनीही अ‍ॅम्ब्युलन्साठी अनेक ठिकाणी धावपळ केली परंतु त्यात वेळ निघून गेला. त्याच्या आईनंही अनेकांना मदतीची विनवणी केली परंतु तोपर्यंत त्या चिमुरड्याची प्रकृती आणखी खालावत गेली होती. त्या मुलानं आपल्या आईच्या कुशीतच प्राण सोडले.

त्यानंतरही त्या कुटुंबीयांना आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी कोणतंही वाहन मिळालं नाही. अखेर त्या आईनं आपल्या त्या जीवासह २५ किलोमीटर दूर असलेल्या घरापर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. काही अंतरावर पोहोचल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याच्या ही बाब निदर्शनास आली. त्यावेळी त्यांनी आपल्या गाडीतून त्या कुटुंबीयांच्या त्यांच्या घरापर्यंत सोडलं. गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलाची तब्येत ठीक नव्हती. तसंच यापूर्वीही उपचार सुरू होते, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. दरम्यान या प्रकरणी तपास करून कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी नवीन कुमार यांनी दिली. तसंच या प्रकरणी रुग्णालयाचे हेल्थ मॅनेजर यांना जिल्हा प्रशासनानं सस्पेंड केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच चार परिचारिका आणि २ डॉक्टरांविरोधातही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.