इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रामचंद्र गुहा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. देशामध्ये करोनाचे रुग्ण वाढत असतानाच केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगलामध्ये निवडणुकीच्या प्रचारसभा घेत असल्याच्या मुद्द्यावरुन गुहा यांनी भाष्य केलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री आज शाह यांच्या जागी असते तर त्यांनी कोणत्या गोष्टीचा विचार केला असता, असा विचार मी कधी तरी करतो, असंही गुहा म्हणाले आहेत. इतकच नाही तर शाह यांनी मागील वर्षभरामध्ये केवळ पश्चिम बंगालमधील सत्ता मिळवणे आणि महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करुन पुन्हा सत्तेत येणे या दोनच गोष्टींना प्राधान्य दिल्याची टीका गुहा यांनी केलीय.

नक्की वाचा >> Coronavirus : “आपल्याला तज्ज्ञांपेक्षा जास्त कळतं असं मोदींना वाटत असल्याने भारतावर ही वेळ आलीय”

प्रसिद्ध पत्रकार करण थापा यांना ‘द वायर’साठी दिलेल्या मुलाखतीमध्ये गुहा यांनी पंतप्रधान मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कारभारावरही टीका केलीय. मोदींच्या व्यक्तीमत्वासंदर्भात भाष्य करताना गुहा यांनी देशात सध्या निर्माण झालेल्या करोना परिस्थितीसाठी मोदींचे नेतृत्व जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याचसंदर्भात बोलताना गुहा यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीमध्ये मोदींनी केलेला प्रचार आणि कुंभमेळ्याला दिलेल्या परवानगीवरुनही टीका केलीय. करोना कालावधीमध्ये राजकारण करण्यावरुन गुहा यांनी शाह यांच्यावर निशाणा साधलाय.

“मी विचार करत होतो की देशाचे पहिले गृहमंत्री या ठिकाणी असते आणि एकीकडे साथीचा रोग आणि दुसरीकडे काही मत मिळवण्यासाठी प्रचार दोन गोष्टी असत्या तर त्यांनी काय निवडलं असतं,” असं म्हणत गुहा यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा संदर्भ मुलाखतीमध्ये दिला. पुढे बोलताना गुहा यांनी वर्षभराच्या कालावधीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्थैर्य आणि शांततेला तसेच करोनासंदर्भातील पुरवठ्याला प्राधान्य देण्याऐवजी राजकारणाला प्रधान्य देत महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही केलीय.

नक्की वाचा >> “…तर राजकारणात मोदींना उद्धव ठाकरेंचा आदर्श ठेवावा लागेल”

“मागील वर्षभरापासून करोनाची साथ सुरु आहे. मात्र देशामध्ये शांतता असावी, स्थैर्य असावं, एकमेकांना धीर घ्यावा, सगळीकडे योग्य प्रमाणात आवश्यक गोष्टींचा पुरवठा व्हावा यासाठी शाह यांचे प्राधान्य नव्हते. तर पश्चिम बंगालमध्ये सत्ता कशी मिळवायची आणि मी महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करुन सत्ता कशी मिळवू शकतो, या दोनच गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिल्याचं पहायला मिळालं. यावरुनच सरकारच्या कारभाराचा अंदाज येतो,” असं गुहा म्हणाले आहेत.