अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात आलेले कमल हसन आता राजकीय क्षेत्रात हळूहळू स्थिर होताना दिसत आहेत. जनतेशी सातत्याने संपर्कात राहत त्यांच्याशी निगडीत विषय उचलून धरण्यात ते सध्या आघाडीवर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते तामिळनाडूतील इरोड येथे आहेत. आज (रविवार) पत्रकारांशी बोलताना त्यांनी जीएसटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जीएसटीमुळे प्रत्येक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याला कचराकुंडीत फेकून दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, जीएसटीमुळे कोणत्याच क्षेत्राचा फायदा झालेला नाही. नोटाबंदीत ५०० आणि १ हजार रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय योग्य होता. पण त्यांनी तो योग्य पद्धतीने पुढे नेला नाही. त्यामुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागला.

तत्पूर्वी इरोड येथील एका सभेत बोलताना त्यांनी युवकांना आभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याऐवजी कृषी क्षेत्रात रस दाखवण्याची गरज असल्याचे म्हटले. देशातील शेती योग्य जमीन युवकांच्या प्रतिक्षेत आहे. युवकांनी आज कृषी तंत्रज्ञानाशी अवगत करून या क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार केला पाहिजे.

यावेळी त्यांनी दारूवरही मत व्यक्त केले. कोणत्याही राज्यात एका दिवसात दारूवर बंदी घालणे शक्य नाही. प्रथम लोकांना यासाठी तयार करायला हवे. जनतेच्या मताशिवाय कोणत्याही सरकारने थेट दारूबंदी केली तर लोक दुसऱ्या एखाद्या वाईट सवयीकडे वळू शकतात.

तत्पूर्वी त्यांनी सत्ताधारी अण्णा द्रमूकलाही इशारा देत आपली कार्यशैली बदलण्याचा सल्ला दिला. जर तुम्ही बदलले नाही तर आम्हाला पाऊल उचलावे लागेल असे म्हणत राज्यात पुढचे सरकार बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा विश्वासही व्यक्त केला.