दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील हवामानामध्ये अचानक बदल झालेला पाहायला मिळत आहे. बुधवारी( दि.३ ) संध्याकाळी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आलेलं वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे. सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश आणि राजस्थानला बसला असून येथे जवळपास ७० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे

बुधवारी( दि.३ ) संध्याकाळी अचानक सुरू झालेला पाऊस आणि भीषण वादळामुळे राजस्थानमध्ये किमान २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. येथील अलवर, भरतपूर आणि धौलपूर परिसराला सर्वाधिक फटका बसला. दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे ३६ जणांनी जीव गमावलाय. तर, ३८ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये वीज आणि भिंत पडल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून दोन व्यक्ती जखमी झाले आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतक-यांची चिंता वाढलीये. अनेक परिसरात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. साठवणूक केलेला धान्यसाठा खराब झाला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दुपारी ४.३० नंतर प्रथम वादळ आणि त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.