उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा वादळाचा कहर पाहायला मिळाला. बुधवारी उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये भीषण वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज पडून १० जणांचा मृत्यू झाला आहे तर २८ जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सीतापूरच्या ६ जणांचा तर गोंडा येथील ३ आणि फैजाबादच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

मंगळवारी हवामान विभागाने याबाबत इशारा दिला होता. फैजाबाद आणि लखनऊच्या परिसरात धुळीच्या वादळाचा फटका बसू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. राजधानी दिल्लीमध्येही बुधवारी हवामान बदललेलं पाहायला मिळालं , येथे धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. पुढील तीन दिवस येथे धुळीचं साम्राज्य असू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीही उत्तर प्रदेशला भीषण वादळाचा फटका बसला होता. त्यावेळी येथे २६ जणांनी जीव गमावला होता. ११ जिल्ह्यांमध्ये या वादळाचा कहर पाहायला मिळाला होता.