तिसरा ध्रुव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिबेटमधील नव्वद टक्के हिमनद्या या दक्षिण आशियातील प्रदूषणामुळे वितळल्या आहेत किंवा त्यांचा संकोच झाला आहे, असे चीनच्या एका वैज्ञानिकाने म्हटले आहे.
तिसरा ध्रुव प्रदेश हा तिबेट पठाराच्या केंद्रस्थानी असून, त्याची सरासरी उंची ४००० मीटर आहे. ५० लाख चौरस किलोमीटरचा भाग त्यात येतो.
अंटाक्र्टिका व आक्र्टिकप्रमाणे तिसरा ध्रुव हा आंतरराष्ट्रीय संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे, पण यापूर्वी या भागाच्या अभ्यासात सातत्य दिसून येत नाही असे तिबट पठार संशोधनविषयक चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे संचालक याओ टाँडाँग यांनी म्हटले आहे. या भागात जास्त हिमनद्या असून त्यांच्यावर भारत व चीनमधील दाट लोकवस्तीच्या प्रदेशातील सामाजिक व आर्थिक विकासाचा परिणाम होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अल्पाइन  हिमनद्यांमध्ये खूपच बदल झाले असून त्यांचा थर पातळ झाला आहे. त्यांचा संकोच झाला आहे, त्यामुळे या पठाराच्या भोवती राहणाऱ्या लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आतापर्यंत तीस वर्षांत झालेल्या संशोधनानुसार तिबेट पठारावरील प्रदूषणाची नवीन माहिती हाती येत आहे. यातील बहुतेक प्रदूषके दक्षिण आशियातून येत आहेत. दक्षिण आशियातील औद्योगिक उत्पादनातून निर्माण होणारा काळा कार्बन भारतातून तिबेट पठारावर येतो तो साठल्यामुळे तिथे हिमनद्यांचा संकोच झाला असून मातीतही ही प्रदूषके मिसळली आहेत.
स्थानशास्त्रीय नकाशांच्या आधारे केलेल्या संशोधननुसार १५ हिमनद्यांचा समतोल ढासळला आहे, तर ८२ हिमनद्या जवळपास नष्ट झाल्यासारख्याच आहेत ७०९० हिमनद्यांचा संकोच झाला आहे.