मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाचा गुरूवारी विस्तार झाला. नव्यानं झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे यांचं पारडं दिसून आलं. त्याचबरोबर या विस्तारानंतर शिंदे यांनी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्यावर टीकास्त्र डागले. “टायगर अभी जिंदा है,” असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदे कमलनाथ व दिग्विजय सिंह यांना उत्तर दिलं.

मध्य प्रदेश सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ व काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांना उत्तर दिलं. “मला कमलनाथ वा दिग्विजय सिंग यांच्याकडून कोणतंही प्रमाणपत्र नकोय. त्यांनी १५ महिन्यांच्या काळात राज्याला लूटलं आहे. त्यांनी सगळ काही स्वतःसाठी केलं. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, टायगर अभी जिंदा है,” असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्ताराविषयी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “ज्या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते जनतेसाठी काम करतील. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली १०० दिवसांपूर्वी सत्तेत आलेलं सरकार करोनाविरुद्ध लढाई लढत आहे. शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे. पुढील चार वर्षातही असंच काम करत राहू. ज्या बारा व्यक्तींनी शपथ घेतली आहे. ते सर्व पोटनिवडणुकीत विजयी होतील,” असा विश्वासही ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्चमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची चर्चाही सुरू झाली. मात्र, गुरूवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे शिवराज सिंह चौहान यांना भारी ठरले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वर्तुळातील १२ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यात महेंद्र सिंह सिसोदिया, प्रभु राम चौधरी, प्रद्युमन सिंह तोमर, इमरती देवी, राजवर्धन सिंह, बृजेंद्र सिंह यादव, सुरेश धाकड, गिरराज दंडोतिया, ओ. पी. भदौरिया, हरदीप सिंह डंग, बिसाहूलाल सिंह आणि एंदल सिंह कसाना यांचा समावेश आहे.