बेकायदा कत्तलखान्यांवर बंदी घालण्यात येत असल्यामुळे उत्तर प्रदेशात मांसाचा तुटवडा पडला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील वाघ-सिंहांवर उपासमारीची वेळ येत आहे. उत्तर प्रदेशात बेकायदा कत्तलखान्यांविरोधात योगी आदित्यनाथ यांनी मोहीम उघडली आहे. त्यामुळे राज्यात म्हशीच्या मांसाचा तुटवडा पडला आहे. उत्तर प्रदेशात गोवंश हत्येला बंदी आहे. परंतु म्हशीचे मांस विक्री करण्यावर बंदी नाही. गेल्या काही वर्षांमध्ये बेकायदा कत्तलखान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. सरकार निवडून आल्यावर बेकायदा कत्तलखान्यांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात मांसाचा तुटवडा आहे.

उत्तर प्रदेशात प्राणी संग्रहालयामध्ये राहणाऱ्या वाघ आणि सिंहांना म्हशीच्या मांसाऐवजी चिकन दिले जात आहे. या प्राण्यांनी चिकन खायला नकार दिला आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी हा मुद्दा संसदेमध्ये उठवला आणि सांगितले मांसाच्या निर्यातीतून भारताला २८,००० कोटी रुपये मिळतात. सरकारच्या धोरणामुळे भारताला आर्थिक फटका तर बसतच आहे परंतु त्यांच्या या वागण्यामुळे वाघ-सिंहांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे असे त्यांनी म्हटले. वाघ-सिंह चिकनकडे पाहत देखील नसल्याचे त्यांनी म्हटले. निसर्गाने प्रत्येकाला त्याच्या गुणधर्मानुसार आहार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे परंतु त्यांचे स्वातंत्र्य या नव्या धोरणांमुळे हिरावले जात आहे. वाघ-सिंह मांस खाणार नाहीत तर मग काय पालक पनीर खातील का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.

इटावा येथील लॉयन सफारीमध्ये देखील सिंहांना चिकन दिले जात आहे. त्यामुळे, गेल्या दोन दिवसांपासून सिंह उपाशी असल्याचे तेथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी तीन सिंहांच्या जोड्या आहेत. त्या गेल्या दोन दिवसांपासून उपाशी आहेत. या ठिकाणच्या सिंहांना रोज ८-१० म्हशींचे मांस द्यावे लागते. चिकन आणि मटनमध्ये स्निग्धता कमी असते. त्यामुळे ते कितीही खाल्ले तरी त्यांचे पोट भरत नाही असे येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या या मोहिमेचे गंभीर परिणाम लखनौमधील प्राणीसंग्रहालयावर पडले आहेत. या ठिकाणी सात वाघ, चार पांढरे वाघ, आठ सिंह, आठ बिबटे, १२ रानमांजरी, दोन तरस, दोन लांडगे इतके प्राणी आहेत. यांना रोज २३५ किलो मांसाची आवश्यकता आहे. प्राणी संग्रहालयातील बहुतेक प्राणी मटन आणि चिकन खात आहेत परंतु कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात एक मादी सिंह गरोदर आहे. ती मात्र चिकन खात नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिच्यासाठी कायदेशीर परवाना असलेल्या कत्तलखान्यामधून म्हशीच्या मासाची व्यवस्था केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.