अमेरिकेत करोनाने अक्षरश: थैमान घातलं असून आता प्राणीही त्याच्या कचाट्यात आले आहेत. न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयातील वाघाला करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेच्या कृषी विभाग राष्ट्रीय पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या प्राण्याला करोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. चार महिन्यांच्या या वाघिणीला प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यामुळे करोनाची लागण झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्राण्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या या कर्मचाऱ्याला नुकतीच करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. १६ मार्चपासून प्राणीसंग्रहालय पूर्णपणे बंद आहे.

प्राणीसंग्रहालयातील पाच वाघ आणि सिहांमध्ये करोनाची लक्षणं आढळू लागल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. वाघिणीसोबत इतर तीन वाघ तीन अफ्रिकन सिंहांना कोरडी सर्दी झाली असून लवकरच त्यांची प्रकृती सुधारेल असं प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आलं आहे.

प्राणीसंग्रहालयातील इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये करोनाची लक्षणं आढळलेली नाहीत. करोनामुळे प्राण्यांच्या प्रकृतीवर काय फरक पडतो याची पाहणी सध्या केली जात आहे. पण सध्या आढळलेल्या निष्कर्षानुसार, त्यांच्या पचनक्रियेत बदल झाला आहे. ते पूर्ण बरे व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पशुवैद्यकीय सेवा प्रयोगशाळेने दिलेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेल्या सर्वांना जोपर्यंत पूर्ण माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.