मध्य प्रदेशात चोवीस तासांत दोन वाघांचा मृत्यू

मध्य प्रदेशात एक वाघीण व तिचा बछडा असे दोन वाघ दोन वेगवेगळय़ा जंगलांत गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांची वाघीण उमारिया जिल्हय़ातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात एका विहिरीत मृतावस्थेत सापडली होती.

बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे रेंजर विजय शंकर श्रीवास्तव यांनी सांगितले, की ही वाघीण जंगली प्राण्यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी पळाली असावी व नंतर विहिरीत पडून बुडाल्याने मरण पावली असावी. वाघिणीच्या मृत्यूची चौकशी वेगवेगळय़ा दृष्टिकोनातून वन खाते करीत आहे. ज्या विहिरीत ही वाघीण पडली ती मिली खेडय़ात आहे. तो बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचा काही वर्षांपूर्वी मध्यवर्ती भाग होता. याशिवाय वाघाच्या बछडय़ाचा सांगाडा शिवनी जिल्हय़ातील पेंच नॅशनल पार्कमधील कर्माझिरी परिक्षेत्रात सापडला आहे. या पार्कचे परिक्षेत्र संचालक शुभरंजन सेन यांनी सांगितले, की शक्तिशाली नर वाघ या भागात कार्यरत असावा व त्याने वाघाच्या बछडय़ावर हल्ला केला असावा. त्या ठिकाणी वाघाच्या पाऊलखुणाही सापडल्या असून, बछडय़ाला मारून ओढत नेल्याच्या खुणाही आहेत. वाघाच्या बछडय़ाचे शवविच्छेदन केले असता त्याच्या कवटीची हाडे तुटलेली दिसून आली. या भागात शिकारीची शक्यता नाही असे त्यांनी सांगितले. पेंच नॅशनल पार्कचे उपसंचालक के. के. गुरवानी यांनी सांगितले, की एक वाघीण तीन बछडय़ांसह फिरत होती, त्यातीलच हा एक बछडा असावा.