अयोध्येत चोख सुरक्षा व्यवस्था

अयोध्या : अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असल्यामुळे, बाबरी मशीद पडल्याच्या घटनेच्या वार्षिक स्मृतीदिनाला विशेष महत्त्व न देण्याचा हिंदू व मुस्लीम धार्मिक नेते प्रयत्न करत आहेत. याच वेळी, पोलिसांनी ६ डिसेंबर या दिवसानिमित्त सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे.

शुक्रवारी हा वार्षिक दिन येत असतानाच अयोध्येत कुठलाही धोका पत्करण्याची पोलिसांची तयारी नाही. ६ डिसेंबरचे कार्यक्रम सौम्यपणे साजरे केले जातील अशी हमी धार्मिक संघटनांनी दिली असली, तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दिवसापूर्वी जशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती, तशीच उद्याही ठेवण्यात आली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

६ डिसेंबर १९९२ रोजी जमावाने वादग्रस्त स्थळावरील बांधकाम जमीनदोस्त केल्याचा दिवस हिंदुत्ववादी संघटना ‘साजऱ्या’ करत आल्या आहेत; तर मुस्लीम संघटनांनी या दिवशी शोक पाळलेला आहे.

या वर्षी ‘दु:खाचा दिवस’ साजरा केला जाईल असे अ. भा. मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळाने (एआयएमपीएलबी) म्हटले असले, तरी ‘ते लोकांवर अवलंबून आहे’, असेही स्पष्ट केले आहे.

बाबरी मशीद पतनाचा २७वा वर्धापन दिन यंदा ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा न करण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेनेही घेतला आहे. या दिवशी कुठलाही जाहीर कार्यक्रम होणार नाही. लोक निरनिराळ्या मंदिरांमध्ये मातीचे दिवे लावू शकतात. सत्याचा विजय झालेला असल्याने आता समारंभ साजरा करण्याचे काही महत्त्व न राहिल्याचे साधूंचेही म्हणणे आहे, असे विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले.