राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रेमींचे अतुट नाते आहे. आता या ठिकाणाहून आनंदाची बातमी आली आहे. टी – ७३ या वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. हे तिन्ही बछडे चार महिन्यांचे असून नुकतेच ते त्यांच्या आईबरोबर आढळल्याची माहिती आहे.
वन्यजीव अधिकाऱ्यांना देखील या नव्या घडमोडीचा माहिती पर्यटकांना जाण्यास बंदी असलेल्या क्षेत्रात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे मिळाली. टी-७३ या वाघिणीने दुसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिला आहे. ही वाघीण लाजाळू स्वभावाची म्हणून पर्यंटकांसह वन्यजीव प्राधिकरणामध्ये प्रसिद्ध आहे.

या घडामोडीबाबत बोलताना विभागीय वन अधिकारी मुकेश सैनी म्हणाले की, रणथंभोरमधील वाघांची संख्या वाढीच्यादृष्टीने ही एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वीच आम्हाला व्याघ्र आरक्षित क्षेत्रात तीन नव्या बछड्यांबाबत माहिती मिळाली होती. मात्र हे वृत्त खात्रीलायक असल्याचा पुरावा नव्हता. शिवाय काही पावलांचे ठसे देखील आढळले होते. पण ते नव्या बछड्यांचेच आहेत हे निश्चित होत नव्हते. अखेर आता तीन नव्या बछड्यांचे रणथंबोरमध्ये आगमन झाल्याचे निश्चित आहे.

आता आम्ही या बछड्यांना संपूर्ण संरक्षण देणार आहोत व त्यांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणार आहोत. हे बछडे ज्या भागात आढळले त्या भागात सुरक्षेच्या विविध उपाययोजना करण्याचे संबंधीतांना आदेश दिले आहेत. टी-७३ ही वाघीण प्रसिद्ध कुटुंबातील आहे आणि ती टी-१७ या वाघिणीची मुलगी आहे, जी सुंदरी या नावाने प्रसिद्ध होती. टी-७३ व्यतिरिक्त, टी-६० जी ज्युनिअर इंदू या नावाने परिचित आहे, ही वाघीण देखील महिनाभरापूर्वी बछड्यांबरोबर आढळली होती.