टिकटॉक या सोशल मीडिया अॅपवर प्रसिद्ध असणाऱ्या २७ वर्षीय जीम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दिल्लीमधील नजफगढ येथे मंगळवारी रात्री तिघांनी गोळ्या घालून मोहित मोर याची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. टिकटॉक अॅपवर मोहित मोर याचे ५.१७ लाख फॉलोअर्स होते. मोहीत हरियाणामधील बहादूरगड येथील असून दिल्लीत राहत होता.

रविवारी द्वारका येथे गँगवॉर झालं होतं. यामध्ये दोन गुन्हेगारांचा मृत्यू झाला होता. याचदरम्यान मोहित मोर याची हत्या झाली आहे. यामुळे पोलीस मोहितच्या हत्येचा गँगवॉरशी काही संबंध आहे का याची पाहणी करत आहेत. पण पोलीस उपायुक्तांनी अद्याप अशाप्रकारची कोणतीही माहिती हाती आली नसल्याचं सांगितलं आहे.

मोहितविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, ‘मोहितच्या मोबाइलची पाहणी केली असता गेल्या काही दिवसांत त्याने अनेकांशी संवाद साधल्याचं दिसत आहे. अनेकांशी त्याची मैत्री झाली होती. त्याच्या हत्येचा यापैकी कोणाशी संबंध आहे का याची चाचपणी करत आहोत’.

मोहित मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका फोटोकॉपी शॉपमध्ये बसला असताना गोळ्या घालण्यात आल्या. मोहितवर एकापेक्षा जास्त वेळा गोळ्या चालवण्यात आल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मोहितचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत असून, याप्रकरणी नजफगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना जे फुटेज मिळालं आहे त्यामध्ये हत्येनंतर तिघेजण रस्त्यावर धावताना दिसत आहेत. यापैकी दोघांनी हेल्मेट घातलं आहे. यापैकी एकाने कोणतंही मास्क घातलं नसल्याने त्याच्या आधारे गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याशिवाय सीसीटीव्हीत आरोपी ज्या स्कूटवरुन आले तीदेखील दिसत असून, नंबर प्लेटच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेतला जात आहे. पण ही स्कूटर चोरीची असावी असा अंदाज आहे.

मोहितच्या वडिलांचं निधन झालं असून त्याच्या मागे आई आणि भाऊ आहे. पोलीस त्यांच्याशी चर्चा करत असून गेल्या काही दिवसांत मोहितची कोणाशी भांडणं झाली होती, किंवा शत्रु निर्माण झाले होते का याची माहिती मिळलत आहेत.