अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला लवकरच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. यासाठी ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान, मंदिर निर्माणासंदर्भातच एक महत्वपूर्ण माहिती समोर आली होती. मंदिर निर्माण करत असताना मंदिराच्या २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’देखील ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. परंतु यापूर्वीही देशात काही महत्त्वाच्या ठिकाणी जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली होती. लाल किल्ल्यातही जमिनीच्या ३२ फूट खाली एक टाईम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे. १९७३ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ही टाईम कॅप्सूल ठेवण्यात आलेली होती. वर्तमानकालीन महत्त्वाच्या घटनांची नोंद असलेली कागदपत्रं आणि इतर वस्तू असलेली जमिनीत पुरुन ठेवलेली कुपी कालकुपी भावी पिढ्यांना उत्खननानंतर सद्यःस्थितीची माहिती व्हावी हा त्यामागील हेतू असतो.

इंदिरा गांधी यांनी १५ ऑगस्ट १९७३ रोजी लाल किल्ल्यात जमिनीच्या ३२ फूट खाली टाईम कॅप्सूल ठेवली होती. स्वातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांच्या घटना पुराव्यांसह यामध्ये ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांनी इंडियन काऊंन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चला मागील काळातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करण्याचं काम सोपवलं होतं. परंतु त्यावेळी सरकारच्या या निर्णयावरून मोठा वादही झाला होता.
इंदिरा गांधी यांनी स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबाचा गुणगौरव केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. दरम्यान, मोरारजी देसाई यांनी ही टाईम कॅप्सूल काढून त्यात कोणत्या गोष्टींची नोंद आहे हे पाहणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच मोरारजी देसाई यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी ती टाईम कॅप्सूल काढलीही होती. परंतु त्यात कसली नोंद करण्यात आली होती याचं रहस्य आजही कायम आहे.

काय असतो उद्देश ?

आगामी पीढीला मागील काळात काय घडलं याची माहिती व्हावी हा टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवण्यामागील मुख्य उद्देश असतो. केवळ लाल किल्ल्यातच नाही तर देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी जमिनीखाली टाईम कॅप्सूल ठेवण्यात आल्या आहेत. आयआयटी कानपूरच्या ५० वर्षांच्या इतिहासाची माहितीदेखील टाईम कॅप्सूलद्वारे जमिनीखाली ठेवण्यात आली आहे.

तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ही टाईम कॅप्सूल जमिनीखाली ठेवली होती. या टाईम कॅप्सूलमध्ये आयआयटी कानपूरचं संशोधन आणि शिक्षकांशी निगडीत माहिती ठेवण्यात आली होती. याव्यतिरिक्त चंद्रशेखर आझाद कृषी विद्यापीठाच्या इतिहासाचीही माहिती अशाचप्रकारे टाईम कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आली आहे.

मोठा इतिहास

टाईम कॅप्सूलला मोठा इतिहास आहे. ही संकल्पना केवळ भारतातच नाही. ३० नोव्हेंबर २०१७ रोजी स्पेनमध्ये ४०० वर्ष जुनी टाईम कॅप्सूल सापडली होती. यामध्ये एक मूर्तीच्या आत काही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये १७७७ च्या आसपासचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांबाबतची माहिती होती.