बेरोजगारीच्या अहवालावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. हुकूमशाह मोदींनी सत्तेतून जाण्याची वेळ आली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. हुकूमशाहने वर्षाला दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले, पण पाच वर्षांनी एका अहवालाने भीषण परिस्थिती उघड केली, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. देशातील २०१७-१८ चा बेरोजगारीचा दर हा ६.१ टक्के इतका आहे. या अहवालानुसार १९७२-७३ पासूनच्या बेरोजगारीचा दर सध्या सर्वाधिक आहे. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चिमटा काढला. ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, आता नोकऱ्याच नाही. हुकूमशाह नेत्याने वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. आता बेरोजगारासंदर्भातील अहवालाने भीषण परिस्थिती उघड केली. बेरोजगारीचा दर ४५ वर्षांमधील सर्वात जास्त असल्याचे भीषण वास्तव या अहवालातून उघड झाले. २०१७- १८ या वर्षात ६.५ कोटी तरुण बेरोजगार होते, आता मोदींची जाण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. #HowsTheJobs असा हॅशटॅग वापरत त्यांनी मोदींना चिमटा काढला आहे.

राहुल गांधींच्या या ट्विटनंतर ट्विटरवर #HowsTheJobs हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. सोशल मीडियावर या अहवालावरुन मोदी सरकारची अनेकांनी खिल्ली देखील उडवली.