पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘भारत बंद’ पुकारला आहे. दिल्लीमधील रामलीला मैदानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित विरोधी पक्षनेते एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित आहेत. यावेळी बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आता सरकार बदलण्याची वेळ आली असल्याचं म्हटलं आहे.

मोदी सरकराने देशाचं हित नसणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. सरकार बदलण्याची वेळ आली आहे असं मनमोहन सिंग बोलले आहेत. रामलीला मैदानावर जाण्याआधी राहुल गांधी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी कैलाश यात्रेवरुन आणलेलं पाणी गांधीजींच्या समाधीवर अर्पण केलं.

राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. २१ विरोधी पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने बंदला पाठिंबा दिलेला नाही. तर मनसेने मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

या पक्षांचा पाठिंबा
‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.