उद्याचे आश्वासक तरूण नेतृत्व म्हणून ‘टाइम’ या नियतकालिकाने २८ वर्षे वयाच्या आलोक शेट्टी या वास्तुरचनाकाराची निवड केली आहे. आलोक शेट्टी यांनी झोपडपट्टीवासीयांसाठी पूरसुरक्षित घरे तयार केली आहेत. आलोक शेट्टी यांची उद्याचे आश्वासक नेता म्हणून निवड करण्यात येत असून त्यांचे कार्य हे जग बदलण्याच्या दृष्टीने उपयोगी आहे, असे ‘टाइम’ने म्हटले आहे. या सन्मानासाठी एकूण सहा प्रेरणादायी तरूणांची निवड करण्यात आली आहे.
‘टाइम’ने म्हटले आहे की, शेट्टी यांनी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. गुंतागुंतीच्या प्रश्नावर सोपी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बंगळुरू येथील ‘परिणाम फाउंडेशन’शी संबंधित असलेले शेट्टी यांनी बंगळुरूच्या एलआरडीइ झोपडपट्टीत काम केले असून त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून दोन हजार लोकांचे जीवन बदलले आहे. शेट्टी यांचे शिक्षण कोलम्बिया विद्यापीठात झाले असून त्यांनी स्मार्ट डिझाइन व शाश्वतता यांचा सुरेख संगम साधला आहे. बांबू, लाकूड व इतर साहित्यापासून त्यांनी ३०० डॉलर किंमत असलेली घरे बनवली आहेत. ही घरे उभारण्यास चार तास लागतात व ती लगेच उतरवूनही ठेवता येतात. या घरांच्या किमती आणखी कमी व्हाव्यात यासाठी सरकारने अनुदान द्यावे, अशी शेट्टी यांची अपेक्षा आहे.
देशाच्या अत्यंत दुर्गम व दुर्लक्षित भागांत प्रवास करताना तेथे आरोग्य आणि शिक्षणासाठी पायाभूत सुविधाच नसल्याचे पाहून मी व्यथित झालो. या भागांमध्ये या पायाभूत सुविधा निर्माण करणे अशक्य नाही. कित्येकदा साधी उत्तरे हीच सर्वोत्तम उपाय सुचवितात.