अमेरिकेतील जगप्रसिद्ध अशा टाइम मॅगझिनने आपल्या मार्च महिन्याच्या आंतरराष्ट्रीय अवृत्तीच्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांना स्थान दिलं आहे. कव्हर फोटोवर आंदोलनकर्त्या महिलांचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोवर “भारतातील शेतकरी विरोध प्रदर्शनाच्या मार्गावर” अशी ओळ लिहिण्यात आली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात मागील चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या टाइमच्या अवृत्तीमध्ये या आंदोलनासंदर्भातील वृत्तांकनाला मुखपृष्ठावर स्थान देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम मॅगझिनच्या पहिल्या पानावर दिल्लीतील टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या २० महिलांच्या गटाचा फोटो छापण्यात आला आहे. सलवार-कुर्ता अशा पारंपारिक पंजाबी पोशाखामध्ये या महिला घोषणाबाजी करताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनामध्ये या महिलांनीही कशाप्रकारे मागील चार महिन्यांपासून आपला सहभाग नोंदवला आहे यासंदर्भातील वृत्तांकन टाइम्स मॅगझिनने आपल्या विशेष लेखामध्ये केलं आहे. ‘I Cannot Be Intimidated. I Cannot Be Bought,’ म्हणजेच आम्हाला धमकावता येणार नाही आणि विकतही घेता येणार नाही अशा अर्थाच्या मथळ्याखाली हा विशेष लेख छापण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश महिला या पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील ग्रामीण भागातील असल्याचेही टाइमने नमूद केलं आहे. या महिलांनी शेतकरी आंदोलनाचा किल्ला मागील चार महिन्यांपासून कशापद्धतीने लढवला आहे यासंदर्भात सविस्तर वृत्तांकन करण्यात आलं आहे.

या लेखामध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक महिलांशी चर्चा करुन त्यांची मतं जाणून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आळा. “आम्ही परत जावं असं का म्हटलं जात आहे? हे केवळ पुरुषांचे आंदोलन नाहीय. आम्ही सुद्धा शेतकरी आहोत,” असं आंदोलकांपैकी एक असणाऱ्या ७४ वर्षीय जसबीर कौर यांनी टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. ऑक्सफैम इंडियाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ८५ टक्के महिला कृषी क्षेत्राशीसंबंधित काम करतात. मात्र देशातील शेतजमीनीच्या मालकीपैकी केवळ १३ टक्के शेतजमीन महिलांच्या नावावर आहे.

बिल्कीस यांचाही टाइमने केला होता सन्मान

टाइम मॅगझिननं २०२० च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच सीएएला विरोध करणाऱ्या शाहीन बागच्या आजी (दादी) म्हणजेच बिल्कीस यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. सीएएच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे करण्यात आलेल्या आंदोलनात ८२ वर्षीय बिल्किस यादेखील आंदोलक म्हणून अनेक दिवस होत्या. कोणी गोळीही चालवली तरी एक इंचही मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time new international cover the women leading india farmers protests scsg
First published on: 05-03-2021 at 13:43 IST