एकाच आठवडय़ात किशोरवयीन मुलाची आणि पत्रकाराची हत्या होणे हे बिहारमधील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचेच लक्षण असून त्यामुळे बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याची वेळ आल्याचे लोक जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
आदित्य सचदेव याची गया येथे तर पत्रकार राजदेव रंजन यांची सिवान येथे हत्या झाली. त्यामुळे बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट तातडीने लागू करण्याची गरज आहे. या दोन घटनांमुळे येथील कायदाव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचेच चित्र आहे.
सचदेव याची ७ मे रोजी हत्या केल्याचा आरोप विधान परिषदेच्या आमदार मनोरमा देवी यांच्या मुलावर आहे, तर रंजन यांची १३ मे रोजी हत्या करण्यात आली होती. बिहारमधील सद्य:स्थिती ‘जंगलराज’पेक्षाही घातक बनलेली असल्याचा आरोप रामविलास पासवान यांनी केला. केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्नपुरवठा मंत्री पासवान यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. प्रसारमाध्यमे आणि नागरिक या प्रकरणी राज्य सरकारवर दबाव निर्माण करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.