पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळणार की कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सत्ता मिळवण्यात यशस्वी होतील या प्रश्नाचं उत्तर २०१९ लोकसभा निवडणुकीनंतर मिळणार आहे. केंद्रात कोणाचं सरकार येईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दरम्यान टाइम्स नाऊ-व्हीएमआरने केलेल्या सर्वेनुसार भाजपाला उत्तर प्रदेशात तगडं आव्हान मिळणार आहे. मात्र याची भरपाई महाराष्ट्र, पश्चिम बंगालसारख्या राज्यात होताना दिसत आहे.

एनडीएची मतदान टक्केवारी ४.४ टक्क्यांनी घसरुन ३८.९ होण्याची शक्यता आहे. तर युपीएच्या मतदान टक्केवारीत ४.१ टक्क्यांची वाढ दिसत आहे. गतवर्षी ५४३ पैकी ३३६ जागा जिंकणाऱ्या एनडीएला यावेळी २५२ जागा मिळू शकतात तर युपीएला १४७ जागा मिळतील. इतरांच्या खात्यात १४४ जागा जाताना दिसत आहेत. यावरुन एनडीए बहुमतापासून (२७२) दूर राहणार असल्याचं तरी सध्याचं चित्र आहे.

जागांच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपासमोर महागठबंधनचं तगडं आव्हान असणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने ८० पैकी ७३ जागा जिंकत दिल्लीत सत्ता मिळवली होती. मात्र यावेळी समाजवादी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीला सर्वात जास्त ५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेनुसार एनडीएला २७ जागा मिळतील. विशेष म्हणजे काँग्रेस यावेळीही फक्त दोन जागांवर जिंकताना दिसत आहे.

४० जागा असणाऱ्या बिहारमध्ये एनडीएला सर्वात जास्त २५ जागा मिळू शकतात. तर युपीएच्या खात्यात फक्त १५ जागा येण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये जेडीयूसोबत भाजपा सत्तेत आहे. बिहारमध्ये ३० पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास भाजपा प्रवक्ता गौरव भाटीया यांनी व्यक्त केलेला आहे.

उत्तराखंडच्या सर्व पाच जागा एनडीएला मिळू शकतात. मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार गेलं असलं तरी लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त २३ जागा त्यांना मिळू शकतात. राज्यातील एकूण २९ जागांपैकी सहा जागा युपीएला मिळण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये एनडीएला पाच तर युपीएला सहा जागा मिळू शकतात. नुकतीच भाजपाने ज्या तीन राज्यांत सत्ता गमावली त्यापैकी एक राजस्थानही आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना २५ पैकी १७ जागा मिळू शकतात. गतवर्षी पक्षाने सर्व जागा जिंकल्या होत्या. यावेळी युपीए आठ जागा आपल्याकडे खेचून घेईल.

गुजरातमध्ये मोदींची जादू कायम आहे. येथील २६ जागांपैकी २४ जागा एनडीएला मिळतील. २०१४ निवडणुकीत खातंही न खोलू शकलेल्या काँग्रेसला यावेळी दोन जागा मिळताना दिसत आहे.

हिमाचल प्रदेशात एनडीएला तीन आणि युपीएला एक जागा मिळू शकते. तर जम्मू काश्मीरात नॅशनल कॉन्फरन्सला चार आणि युपीए एनडीएला प्रत्येकी १-१ जागा मिळण्याची शक्यता आहे. चंदीगडची एक जागा युपीएच्या खात्यात जाईल.

जर आज निवडणूक झालीतर महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी सर्वात जास्त ४३ जागा एनडीएला मिळू शकतात. मतदान टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास २०१४ च्या तुलनेत २.२ टक्क्यांची वाढ होऊन ५३.५ टक्के होईल. युपीएला मात्र पाच जागांवरच समाधान मानावं लागेल. महाराष्ट्रात भाजपाची कामगिरी त्यांना सरकार स्थापन करण्यास मदत करेल. गोव्यात बरोबरीचा सामना असून एनडीए आणि युपीएला प्रत्येकी १-१ जागा मिळू शकते.

ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसला सर्वात जास्त ३२ जागा मिळतील. येथे भाजपाचाही फायदा होताना दिसत आहे. राज्यातील एकूण ४२ जागांपैकी एनडीएला नऊ आणि युपीएला एक जागा मिळू शकते. ओडिशात एनडीएला फायदा होताना दिसत आहे. २१ पैकी १३ जागा एनडीएला मिळतील.