लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे तिरुमला तिरुपती देवस्थानचे दरवाजे ऐंशी दिवसांनी उघडणार आहेत. येत्या सोमवारपासून या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडणार आहेत. मात्र दर्शनासाठी काही अटी असणार आहेत. केंद्र सरकारने लॉकडाउन ३० जूनपर्यंत वाढवला असला तरीही काही बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. देवस्थानं उघडण्यास संमती देण्यात आली आहेत. दरम्यान देवस्थानं उघडायची की नाही हा निर्णय राज्यांवर सोपवण्यात आला आहे. महाराष्ट्रात मंदिरं किंवा धार्मिक स्थळं उघडण्याची संमती अद्याप राज्य सरकारने दिलेली नाही. मात्र आंध्र प्रदेशात असणारे तिरुमला तिरुपती देवस्थान ८ जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाचे मुख्य तसेच या मंडळाचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार यांनी ही माहिती दिली आहे. सोमवारपासून मंदिर भक्तांसाठी सुरु करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी शर्थींचे पालन करावे लागणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.

तिरुमला तिरुपती मंदिरात दर्शनासाठी या आहेत अटी

२० मार्चपासून तिरुमला तिरुपती देवस्थान हे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आता ८ जूनपासून प्रायोगित तत्त्वावर हे मंदिर सुरु करण्यात येत आहे.

रोज सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेतच भक्तांना दर्शन घेता येणार आहे. यावेळी ५०० भक्तांना सोडण्यात येईल

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रायोगित तत्त्वावरच दर्शनासाठी मंदिरात जाता येईल. ज्यांनी ८ आणि ९ जूनसाठी इंटरनेटवरुन दर्शनाची वेळ निश्चित केली आहे अशानांच फक्त या मंदिरात प्रवेश दिला जाईल

ज्या भाविकांना ८ आणि ९ जूनला दर्शन घ्यायचे आहे त्यांनी त्यांच्या दर्शन या ६ आणि ७ जून या दिवशी इंटरनेटवर नोंदवणे आवश्यक आहे

केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुले यांनी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही

१० जून पासून टाइम स्लॉट टोकन्स तिरुमला येथील भाविकांना वाटली जातील. एका तासात ५०० भाविक ही अट कायम असेल

११ जूनपासून ३०० रुपये मूल्य असलेली ३ हजार तिकिटं तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असणार आहेत. ऑनलाइन तिकिट बुकिंगचा कोटा ८ जूनपासून सुरु होईल

जे गावांमधून किंवा ग्रामीण भागांमधून तिरुपतीच्या दर्शनासाठी येत आहेत त्यांनाही तिकिटं ऑनलाइन बुक करता येणार आहेत. त्यांना स्वयंसेवक तिकिट कसं बुक करायचं याचं मार्गदर्शन करतील

३ हजार सर्व दर्शन तिकिटं तिरुपती येथील काऊंटरवरही उपलब्ध होणार आहेत

११ जूनपासून VIP दर्शनही सुरु करण्यात येणार आहे. त्याचेही बुकिंग आधी करणे आवश्यक

मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष उपाय योजना करण्यात आल्या आहेत

तिरुपती येथे कोविड १९ च्या रोज २०० चाचण्याही केल्या जाणार आहेत

सध्याच्या घडीला तीन दिवसांची विधी असलेला ज्येष्ठ अभिषेकम हा तिरुपती बालाजी मंदिरात सुरु करण्यात आला आहे असंही मंदिर समितीने स्पष्ट केलं.