तिरुपूर येथे एलआयसी एजंट असणाऱ्या व्ही गुनसेकरन यांना २०१२ रोजी एके दिवशी खात्यात अचानक ४० लाख रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. हे पैसे कुठून आले ? कोणी पाठवले ? याची कसलीही माहिती न घेतला गुनसेकरन यांनी पत्नी राधासोबत हे सर्व पैसे उडवून टाकले. या पैशात त्यांनी नवं घर विकत घेतलं, इतकंच काय तर मुलीच्या लग्नाचा खर्चही केला. पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. ट्रायल कोर्टाने सोमवारी दांपत्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चुकून खात्यावर जमा झालेली रक्कम खर्च करणे दांपत्याला चांगलंच भोवलं आहे.

ही रक्कम खासदार स्थानिक परिसर विकास योजना आणि आमदार स्थानिक परिसर विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली होती. सार्वजनिक विकास बांधकाम खात्याकडून होणाऱ्या नागरी कामांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने उपअभियंत्याचा खाते क्रमांक लिहिण्याऐवजी चुकून गुणसेकरन यांचा क्रमांक लिहिला.

तिरपूर येथील कॉर्पोरेशन बँकेत दोघांचंही खातं आहे. पैसे चुकून गुणसेकरन यांच्या खात्यात जमा झाले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आठ महिने याची कल्पनाच नव्हती. पैसे खात्यात जमा झाले नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेशी संपर्क साधला. बँक अधिकाऱ्यांनी तपासणी केली अशता हे पैसे गुणसेकरन यांच्या खात्यात जमा झाले असून, काही दिवसांत सगळे पैसे काढून घेण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

कॉर्पोरेशन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुणसेकरन यांच्याकडे हे पैसे पुन्हा आपल्या खात्यात जमा करा जेणेकरुन बँक ते मिळवू शकेल अशी विनंती केली. पण गुणसेकर पैसे जमा करु शकले नाहीत. बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. न्यायालायने दांपत्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून कोईम्बतूर केंद्रीय कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.