टायटॅनिक या जहाजाच्या ऐतिहासिक दुर्घटनेतील डेकचेअर खुर्चीचा लिलाव इंग्लंडमध्ये झाला असून त्याला १ लाख पौंड इतकी किंमत आली आहे. हेन्री अल्ड्रीज अँड सन्स या विल्टशायरमधील डेव्हिझेस येथील कंपनीने केलेल्या लिलावात करासह या खुर्चीला एवढी किंमत आली आहे. इंग्लंडच्याच एका संग्राहक व्यक्तीने ऐतिहासिक व्यक्तींची आवड म्हणून ही खुर्ची घेतली आहे असे सांगण्यात आले.
 ज्या किमतीला खुर्ची मिळाली त्याबाबत संबंधित व्यक्तीने समाधान व्यक्त केल्याचे ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे, नानटुकेट लाकडी खुर्ची त्या दुर्घटनेत पाण्यावर तरंगत होती व मॅके बेनेटच्या कर्मचाऱ्यांना ती सापडली होती. १४ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक दुर्घटना घडली होती. जहाजावर पहिल्या वर्गातील लोकांना बसण्यासाठी ती खुर्ची होती, ती सापडल्यानंतर माजी कर्मचारी ज्युलियन लेमार्टलेर यांना देण्यात आली होती. १५ वर्षे ती इंग्लंडमधील टायटॅनिक वस्तू संग्राहक व्यक्तीच्या ताब्यात होती. मॅके-बेनेटच्या कर्मचाऱ्यांना अशा सहा ते सात खुच्र्या तेव्हा सापडल्या होत्या.