पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केदारनाथ दौऱ्याचे प्रसार माध्यमांवर प्रक्षेपण करण्यात आले असून हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हणत, तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाला चिठ्ठी लिहून तृणमूल काँग्रेसने कारवाई करण्याची मागणी केली. लोकसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान आज (रविवार) सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथाच्या दर्शनाला गेले असून त्यांच्या या दौऱ्याला प्रसारमाध्यमांमधून मोठी प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच प्रचार संपल्यानंतरही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. पंतप्रधानांनी या दौऱ्यादरम्यान, केदारनाथच्या विकासाच्या प्लॅनचीही घोषणा केली होती. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृणमूलने निवडणूक आयोगाने केली आहे. पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये तब्बल 17 तास ध्यानधारणा केली होती. त्यानंतर ते बद्रीनाथला पोहोचले.

शनिवारी दुपारी मोदी केदारनाथला पोहोचले होते. केदारनाथाची पूजा केल्यानंतर त्यांनी विकासकामांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी गुफेत ध्यानधारणा केली. ध्यानधारणेनंतर पंतप्रधानांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षांपासून मला या ठिकाणी येण्याची संधी मिळत आहे. या जागेशी आपले विशेष नाते असल्याचेही मोदी म्हणाले. अनेक दिवसांनंतर मला एकांतात राहण्याची संधी मिळाली. तसेच केदारनाथाचे 24 तास दर्शन होऊ शकेल, अशी ती गुफा होती. या ठिकाणी असताना मी कोणाशीही संपर्कात नव्हतो, असेही त्यांनी बोलताना सांगितले. मोदींनी माध्यमांशी साधलेल्या संवादानंतर तृणमूलने त्यांच्या दौऱ्याला प्रसारमाध्यमांकडून दिली जाणारी प्रसिद्धी ही आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. तसेच या विरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारही केली आहे.