पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौर्‍याविरोधात तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार नोंदविली आहे.

तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या बांगलादेश दौर्‍याच्या वेळेस फटकारले होते आणि म्हणाल्या की, बंगालमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेवूनच या दौर्‍याचे आयोजन केले आहे. टीएमसीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की पंतप्रधान मोदींचा बांगलादेश दौरा हा “लोकशाहीच्या आदर्शाचे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेचे घोर उल्लंघन” आहे.

टीएमसीने आपल्या पत्राद्वारे म्हटले आहे की पंतप्रधान बांगलादेशच्या दौर्‍यावर गेले त्याबद्दल आमच्या पक्षाला काही आक्षेप नाही, परंतु भेटीच्या वेळेहद्दल आम्हाला आक्षेप आहे. पत्रात म्हटले आहे की, “२७ मार्च रोजी बांगलादेशातील श्री मोदींच्या कार्यक्रमांवर तृणमूल काँग्रेस जोरदारपणे आक्षेप घेते. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा ५०व्या वर्धापन दिन किंवा ‘बंगबंधू’ यांची जन्मशताब्दी या दोन्ही गोष्टींचा त्यांच्या दौऱ्याशी काहीही संबंध नव्हता.”

टीएमसीने म्हटले आहे की ही भेट काही मतदारसंघातील मतदारांवर “पूर्णपणे प्रभाव पाडण्यासाठी” आयोजित करण्यात आली होती.

शनिवारी, बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असताना पंतप्रधान मोदी बांगलादेशातील मातुआ मंदिरात गेले होते. तेथे त्यांनी प्रार्थना केली. बंगाल निवडणुकीवर लक्ष ठेवून पंतप्रधानांनी बांगलादेश भेटीची वेळ ठरवली होती त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर मतदान संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी जाहीर सभेत म्हटले होते की, “मोदी बांगलादेशातील एका मंदिरात पश्चिम बंगालमधील निवडणुकांवर डोळा ठेवून भाषण देत आहेत.”

“हे निवडणूक आचारसंहितेचे संपूर्ण उल्लंघन आहे, आम्ही निवडणूक आयोगाकडे हा मुद्दा उपस्थित करीत आहोत,” ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमधील मतुआ समुदायाचे ३० दशलक्ष लोक असल्याचे समजते.