News Flash

ममता बॅनर्जींचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पत्र; आवाहन करत म्हणाल्या…

पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रात सात मुद्द्यांचा उल्लेख केला असून भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे असं म्हटलं आहे. तसंच देशातील जनतेसमोर आपण नवा पर्याय ठेवला पाहिजे असंही मत व्यक्त केलं आहे.

नुकताच दिल्लीत नवीन कायदा मंजूर करण्यात आला असून यामध्ये केंद्राचे प्रतिनिधी असणाऱ्या नायब राज्यपालांना लोकनियुक्त सरकारच्या तुलनेत जास्त अधिकार देण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांनी पत्रामध्ये याचा उल्लेख करत देशातील अशा सात घटनांचा उल्लेख केला आहे ज्याला त्यांनी भाजपाने लोकशाही आणि सहकारी संघराज्यवर केलेला हल्ला असं म्हटलं आहे.

“भाजपा इतर पक्षांना घटनात्मक हक्क आणि स्वातंत्र्य मिळू नये यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकारांचे अधिकार सौम्य करून त्यांना केवळ पालिकेच्या स्तरावर न्यायचं आहे. थोडक्यात त्यांना संपूर्ण देशात एका पक्षाचं हुकूमशाही शासन स्थापन करायचं आहे,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

“मला वाटतं ती वेळ आली आहे जेव्हा भाजपाकडून लोकशाही आणि राज्यघटनेवर होत असलेल्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. टीएमसीची प्रमुख म्हणून मी मनापासून तुमच्यासोबत आणि समविचारी इकर पक्षांसोबत या लढ्यात आहे,” असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जींनी हे पत्र सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबतच डीएमकेचे स्टॅलिन, वायएसआर काँग्रेस प्रमुख जगन मोहन रेड्डी, बीजेडी प्रमुख नवीन पटनाईक, तेलंगण राष्ट्रसमिती प्रमुख चंद्रशेखर राव, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना पाठवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 5:02 pm

Web Title: tmc mamata banerjee letter to ncp sharad pawar shivsena uddhav thackeray congress sonia gandhi sgy 87
Next Stories
1 “…तर टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा!” राहुल गांधींची बोचरी टीका!
2 कृषी कायद्यांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयात! ३ सदस्यीय समितीने बंद लिफाफ्यात अहवाल केला सादर!
3 विषाणूच्या उत्पत्तीबाबत पुर्नविचार करण्याचे डब्ल्यूएचओच्या प्रमुखांचे मत; चीनवर दबाव
Just Now!
X