पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत समोर भाजपाचं आव्हान असताना ममता बॅनर्जी यांच्यासमोर आणखी एक नवं आव्हान उभं ठाकलं आहे. निवडणूक हळूहळू जवळ येत असताना तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. बंगालच्या राजकारणात दबदबा असलेले नेते सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमूलच्या आणखी एका आमदाराने पक्षाचा राजीनामा दिला आहे. मागील दोन दिवसांत तीन नेत्यांनी तृणमूल सोडल्यानं ममतांची डोकेदुखी वाढली आहे.

मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनामा हा ममतांना मोठा धक्का मानला जात असतानाच जितेंद्र तिवारी यांनीही तृणमूलला रामराम केला. दोन नेत्यांच्या राजीनाम्यानं पश्चिम बंगाल राजकारणात खळबळ उडालेली असतानाच तृणमूलच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला. शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनी पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेही लवकरच तृणमूल सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

आणखी वाचा- मोदी सरकार-ममता संघर्ष पेटला! मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना केंद्राकडून समन्स

अधिकारी यांना केंद्राकडून झेड सुरक्षा

सुवेंदू अधिकारी, जितेंद्र तिवारी आणि शीलभद्र दत्त लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार आहे. या दौऱ्याआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. त्यामुळे हे नेते भाजपामध्ये जाणार असल्याचं खात्रीने सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारनं त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे अधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला एकप्रकारे दुजोरा मिळाला आहे.