पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश करण्याचा सपाटा सुरूच असल्याचे दिसत आहे. आता आणखी एक आमदार भाजपात प्रवेश करणार आहे. अलीपुरदुआरमधील कालचीनी मतदार संघाचे टीएमसीचे आमदार विल्सन चामपामारी यांनी आपण १८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचे माध्यमांना सांगितले आहे. तसेच आणखी अनेकजण भाजपात प्रवेश करणार आहेत, यासाठी ते भाजपाच्या वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले होते. परिणामी टीएमसीचे अनेक नेते, आमदार व नगरसेवक भाजपात प्रवेश करत आहेत. भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले होते की, ज्याप्रकारे लोकसभा निवडणुका सात टप्प्यात झाल्या आहेत त्याचप्रकारे टीएमसी नेत्यांचा भाजपा प्रवेश देखील सात टप्प्यात होईल.

आतापर्यंत टीएमसीचे तीन आमदाकर व जवळपास शंभर नगरसेवक भाजपात सहभागी झालेले आहेत. तर या भाजपा प्रवेशांवरून टीएमसी प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, टीएमसी कमकुवत पार्टी नाही, मला या गोष्टीची चिंता नाही की नगरसेवक पैसे घेऊन पक्ष सोडत आहेत. जर एखाद्या आमदारास पक्ष सोडायचा असेल तर त्याने खुशाल सोडावा. जर एकजण पक्ष सोडत असेल तर टीएमसी नवीन ५०० जण तयार करेल.