तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार तसेच ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत निकटस्थ सहकारी सौगात रॉय यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या वाणिज्य, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सल्लागार असणाऱ्या रॉय यांचे ममतांशी खटके उडाल्याने हा पक्षांतर्गत उद्रेक झाल्याचे सांगितले जात आहे.
माजी केंद्रीय मंत्री असणारे रॉय यांना उद्योग उभारणीच्या नियोजनाचा विशेष अनुभव असल्याने त्यांची सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली होती. मात्र गेल्या आठवडय़ात त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यात व ममता बॅनर्जी यांच्यात मतभेद झाल्याचे समजते. प. बंगालमध्ये मोठे उद्योगधंदे उभारणे कठीण नाही, मात्र काही कारणांमुळे ते शक्य होत नाही, असे जाहीर विधान त्यांनी केले होते. उद्योगांसाठी लागणाऱ्या जमिनींचे अधिग्रहण योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी ममता आग्रही असल्यानेच उद्योगांच्या उभारणीस विलंब होतो, असा या विधानाचा अर्थ काढण्यात आल्याने तृणमूलवर ही आफत आल्याचे बोलले जात आहे. उद्योगमंत्री पार्थ चटर्जी यांनी मात्र या शक्यतेचे खंडन केले आहे. प. बंगालमध्ये नवीन उद्योग उभारणीसमोर जमिनींच्या अधिग्रहणाची समस्या नाही, तर पायाभूत सुविधांची अडचण आहे, असे ते म्हणाले. रॉय यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबाबत आपण काही सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्वत: रॉय यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तृणमूलच्या एका ज्येष्ठ नेत्याने मात्र नाव न सांगण्याच्या अटीवर रॉय यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.