तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या शिष्टमंडळाने सोमवारी पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांची भेट घेतली आणि भाजपाशासित राज्यांतील सशस्त्र दलाच्या जवानांना पश्चिम बंगालमधील निवडणूकांदरम्यान तैनात करू नये, अशी विनंती त्यांना केली. “भाजपाच्या सुवेंदु अधिकारी यांनी आश्रय दिलेल्या सर्व गुन्हेगारांना अटक करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची विनंती देखील सत्ताधारी पक्षाने अधिकाऱ्यास केली.

या बैठकीत टीएमसीच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील सर्व असामाजिक घटकांची तातडीने चौकशी करण्यास सांगितले व राज्यात नि:पक्ष निवडणुका निश्चित करण्यासाठी त्यांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यास सांगितले.

पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार किंवा अन्य कोणत्याही भाजपा / एनडीए शासित राज्यांमधून सशस्त्र सेना तैनात करू नये अशी विनंती देखील शिष्टमंडळाने त्यांना केली. सत्ताधारी पक्षाने आरोप केले की भाजपचे सुवेंदू अधिकारी मतदारसंघात अनेक ठिकाणी नंदीग्राममधील रहिवासी नसलेल्या गुन्हेगारांना मदत करीत आहेत. आश्रय घेतलेल्या बाहेरील सर्व गुन्हेगारांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले निर्देशित करण्याची विनंती शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकार्यांना केली.

 

नंदीग्राम मतदारसंघात येत्या १ एप्रिल रोजी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान होणार आहे. या मतदारसंघात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आता भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी एकमेकांसमोर उभे आहेत. ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये भव्य रोड शो केला. ‘ममता बॅनर्जी झिंदाबाद!’ अशी घोषणा देत शेकडो स्थानिक लोक आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते