राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सामूहिक बलात्कारापासून वाचण्यासाठी एका 32 वर्षीय महिलेने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याची घटना समोर आली आहे. मोहाना परिसरात झालेल्या या घटनेनंतर महीला गंभीर जखमी झाली असून तिला जवळील जयपुरिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू केली आहे.

जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहाना परिसरातील एका व्यक्तीने शनिवारी पहाटेच फोन करुन एका महिलेने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल करुन प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्या महिलेला शुक्रवारी संध्याकाळी इमारतीमध्ये दोन पुरूषांसोबत येताना पाहिलं होतं, अशी माहिती इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना दिली. रात्री जवळपास 3 वाजण्याच्या सुमारास महिलेने तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून उडी मारली. त्यानंतर तिने केलेल्या आरडाओरडीमुळे स्थानिक नागरिक तेथे जमा झाले.

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ज्या दोन व्यक्तींसोबत इमारतीत आली होती, त्यातील एकाला ती आधीपासूनच ओळखत होती. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने तिच्यासह बलात्काराचा प्रयत्न केला होता. त्याच्यापासून बचावासाठी तिने फ्लॅटमधून उडी मारली. या प्रकरणी दोन्ही आरोपींचा कसून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून संबंधित महिलेची प्रकृती आता स्थिर आहे.