कांदे खरेदीसाठी हातात आधार कार्ड घेऊन चार किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा, असे चित्र सध्या हैदराबादमध्ये पाहायला मिळत आहे.  कारण, कांद्याच्या दरात झालेली कमालीची वाढ पाहून येथील राज्य सरकारने नागरिक सरकारी योजनेतून आधार कार्ड धारकांना २० रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे.

खासगी बाजारामध्ये कांद्याचा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये इतका आहे. पण राज्य सरकारने केवळ २० रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांची कांदा खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. मात्र, सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना तासन् तास रांगेत उभे राहायला लागत आहे. तर, नागरिकांच्या गर्दीला सामोरे जाताना सरकारने नियोजित केलेल्या अधिकाऱयांची दमछाक होत आहे.

कांद्याचे भाव गगनाला भीडलेले असताना राज्यातील जनतेला कांदा कमी दरात उपलब्ध व्हावा यासाठी येथील राज्य सरकारने खास योजना आखली आहे. एका कुंटुंबाला एका आठवड्याला २ किलो कांदा या योजनेतून केवळ २० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र, तो खरेदी करण्यासाठी ग्राहकाने आधार कार्ड दाखवणे  अनिवार्य करण्यात आले आहे.