एकीकडे देशात महिला सशक्तीकरण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे राजस्थान शिक्षण विभागाने महिलांना तंदुरूस्त राहण्यासाठी घरात झाडू मारणे, दळण दळण्याचा सल्ला दिला आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या मासिकात हा सल्ला देण्यात आला आहे. शालेय शिक्षकांवर केंद्रीत असलेले ‘शिविरा’ हे राजस्थान सरकारचे मासिक आहे. यामध्ये शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाशी निगडीत लेख प्रकाशित केले जातात. या अंतर्गतच नोव्हेंबर महिन्यातील अंकात ‘तंदुरूस्त राहण्याचे सोपे उपाय’ या शीर्षकाखाली एक लेख प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये महिलांना आरोग्यदायी जीवन जगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर तंदुरूस्त राहण्यासाठी १४ उपाय सांगितले आहेत.

लेखात म्हटले आहे की, तंदुरूस्त राहायचं असेल तर सकाळी-सकाळी फिरायला जाणे आवश्यक आहे. तसेच पळणे, सायकल चालवणे किंवा कोणताही खेळप्रकार, व्यायाम हे चांगले उपाय आहेत. महिलांनी दळण दळणे, पाणी भरणे, झाडू मारणे, फरशा पुसणे आदि घरकामांमुळे चांगला व्यायाम होऊ शकतो. छोट्या मुलांसमवेत खेळण्यासाठी रोज थोडा वेळ द्यावा, १०-१५ मिनिटे मनसोक्त हसण्यानेही चांगला व्यायाम होतो, असे या लेखात म्हटले आहे. या लेखात तंदुरूस्त राहण्याचे १४ उपाय सांगण्यात आले आहेत. मासिक प्रकाशित झाल्यानंतर आता शिक्षण विभागावर टीकेची झोड उठली आहे.