चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; १.४ कोटी डॉलर्स खर्च; दोन मजली इमारतीएवढा आकार

पृथ्वीचे भवितव्य काय असेल तसेच हवामान व जैविक प्रणालींमध्ये काय बदल होतील या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चीनने एक योजना आखली असून त्यात मॅजिक क्यूब नावाचा एक दोन मजली महासंगणक तयार करण्यात आला आहे. त्याचा खर्च १.४ कोटी डॉलर्स इतका आहे. चीनच्या वैज्ञानिकांनी असे म्हटले आहे की, पृथ्वीवरील नैसर्गिक प्रणालीत होणारे बदल शोधले जाऊ शकतात किंवा त्याची नोंद करता येईल. अगदी ढगांच्या निर्मितीतील बदलांपासून सर्व बाबतीत आगामी काळात होणाऱ्या बदलांचे भाकित करता येतील.  चायनीज अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या या योजनेत अनेक संस्था सहभागी होत असून एक खास महासंगणक त्यासाठी तयार करण्यात आला आहे.

अर्थ सिस्टीम न्युमरिकल सिम्युलेटर अँड सॉफ्टवेअरचे प्राथमिक रूप असलेल्या या महासंगणकाला सीएएस अर्थ सिस्टीम मॉडेल १.० असे नाव देण्यात आले आहे. त्याचे नाव ब्लू मॅजिक क्यूब असून तो उत्तर बीजिंगमध्ये झोंगुआनकुन सॉफ्टवेअर पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यात ९ कोटी युआन म्हणजे १.४ कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. त्याची क्षमता १ पेंटाफ्लॉप असून तो चीनमधील दहा शक्तिमान महासंगणकांपैकी एक असणार आहे. त्याची साठवण क्षमता ५ पीबी आहे. आगामी प्रगत मॅजिक क्युबच्या एक दशांश आकाराचा हा महासंगणक आहे. सध्या त्याच्या मदतीने हवा प्रदूषण व हवामान अंदाज कमी काळाकरिता दिले जातील.

हवामान बदलात सुधारणेस मदत

चायनीज अ‍ॅकडमी ऑफ इंजिनियरिंग व चीनच्या हवामान प्रशासनाचे सदस्य डिंग यिहुई यांनी सांगितले की, चीनच्या पृथ्वी परिसंस्थांच्या सादृश्यीकरणासाठी ही योजना आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅटमोस्फेरिक फिजिक्सचे संशोधक झांग मिंगहुआ यांनी सांगितले की, कॅस अर्थ सिस्टीम मॉडेल १.० मध्ये हवामान जैवसंस्था तसेच त्यांच्या अन्योन्यसंबंधाचा विचार केला आहे. अवकाशातील वैश्विक किरण व सौरवात यांचे सादृश्यीकरण त्यात आहे. आगामी तीस वर्षांतील हवामान बदल त्यात सांगता येतील तसेच हवा प्रदूषक कणांचा अंदाज २.५ पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) पर्यंत सांगता येईल. हरितगृह वायू व हवामान बदलात सुधारणा करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे.

 बदल सहा वर्षांसाठी नोंदवणार

सुगॉन इनफॉर्मेशन इंडस्ट्री कंपनीचे अधिकारी काओ झेन्नन यांनी सांगितले की, पृथ्वीच्या संपूर्ण यंत्रणेचे सादृश्यीकरण करण्यासाठी यापेक्षा शक्तिशाली संगणक आवश्यक आहे. अर्थ सिस्टिम न्युमरिकल सिम्युलेटर हा हवामान बदल, जलचक्रातील बदल, खडक व मातीतील बदल सहा वर्षांसाठी नोंदवणार आहे. आताचे जे उपलब्ध प्राथमिक सादृश्यीकरण संगणकाचे रूप आहे त्याच्या १० पट वेगाने हा संगणक काम करणार आहे.