दुसऱ्या पुरुषासोबत विवाह करण्यासाठी पत्नीने स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात बाराबंकी येथे समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिला रुबी आणि तिचा दुसरा नवरा रामू या दोघांना अटक केली आहे. हुंडयासाठी सासरकडच्या मंडळीच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याचा बनाव रुबीने रचला होता. बाराबंकी येथे राहणाऱ्या रुबीने जानेवारी २०१६ मध्ये त्याच परिसरात रहाणाऱ्या राहुल नावाच्या मुलाबरोबर लग्न केले होते.

जून २०१८ मध्ये रुबीचे वडिल हरीप्रसाद यांनी हुंडयासाठी सासरकडच्या मंडळींनी रुबीची हत्या केली अशी तक्रार सफदरगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना सुरुवातीलाच अनेक गोष्टी खटकल्या. त्यामुळे त्यांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर रुबीचे वडिल हरीप्रसाद यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. अखेर कोर्टाच्या आदेशावरुन जुलै २०१८ मध्ये पोलिसांनी एफआयआर नोंदवला. जावयाने म्हणजे राहुलने हुंडा मिळाला नाही म्हणून माझ्या मुलीची हत्या केली असा हरीप्रसाद यांचा आरोप होता. तपास सुरु केल्यानंतर आम्हाला रुबीचा मृतदेह सापडला नाही असे बाराबंकीचे एसपी व्ही.पी.श्रीवास्तव यांनी सांगितले.

तपासा दरम्यान आम्हाला रुबीचे फेसबुक अकाऊंट अॅक्टीव्ह असल्याचे लक्षात आले. आम्ही दोन महिने तिच्या फेसबुक अकाऊंटच्या अपडेटवर लक्ष ठेऊन होतो तसेच तिच्या मोबाइल फोनचीही टेहळणी सुरु केली. फेसबुक आणि कॉल रेकॉर्डमुळे रुबी दिल्लीमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची टीम थेट दिल्लीला रवाना झाली व त्यांनी रुबी आणि तिचा दुसरा नवरा रामू दोघांना अटक केली. तपासामध्ये रुबीने रामूबरोबर लग्न करण्यासाठी मृत्यूचा बनाव रचल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिचा पहिला पती राहुल विरोधात नोंदवलेला गुन्हा मागे घेतला असून तिच्या वडिलांविरोधात कोर्टाची दिशाभूल केली म्हणून कलम १८२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.